विपश्यना शिबीरामध्ये धर्मसेवकांसाठी आचारसंहिता

आचार्य गोयन्काजींचा धम्मसेवेचे महत्व यावर संदेश

सेवा देता देता आपण हे शिकत असतो, की धर्माचा दैनंदिन जीवनात कशा रितीने उपयोग करता येईल. अखेर धर्म म्हणजे काही दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून पलायन नव्हे. शिबीराच्या वेळेस किंवा कोणत्याही विपश्यना केन्द्रावरील छोट्याशा दुनियेत साधकांबरोबर धर्मानुसार व्यवहार करताना प्राप्त परिस्थितीला सामोरे जाऊन आपण जणू स्वतःला तयार करत असतो, की जेणेकरून बाह्य विश्वातही आपण निरनिराळ्या परिस्थितींमध्ये धर्मानुसार काम करु शकू. वस्तुतः घटना आपल्या मनाविरुद्ध घडतच असतात, तरीही अशावेळी आपण मनाचे संतुलन राखण्याचा अभ्यास करतच असतो आणि त्याप्रती प्रतिक्रियेच्या रूपात मैत्री व करुणेची भावना विकसित करत राहते. हे एक प्रशिक्षण आहे ज्यात आपण प्राविण्य मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. शिबीरासाठी बसलेल्या साधकांप्रमाणेच आपण सुध्दा तसेच साधक असतो.

विनम्रतापूर्वक दुसऱ्याना सेवा देताना आपण शिकतच राहावे. असाच विचार करा,” मी येथे शिक्षण प्राप्त करीत आहे, आणि त्या बदल्यात माझी कुठलीही अपेक्षा नाही. मी सेवा देतो कारण दुसऱ्यानांदेखील धम्मापासून फायदा मिळावा. चांगला आदर्श ठेवताना मला त्याना मदत करु दे आणि असे करतानाच मी स्वतःला देखील मदत करीत आहे.”

सर्वजण जे धर्मसेवा देत आहेत ते धर्मामध्ये पुष्ट होवोत. दुसऱ्याप्रती सद्भाव,मैत्री व करुणेचा भाव विकसीत करायला शिकोत. आपण सर्वजण धर्मामध्ये प्रगती करुन खरी शांती, खरी मैत्री व खऱ्या सुखाचा अनुभव करोत.

आचार्य सत्यनारायण गोयन्का

तुम्हाला धम्मसेवेचा पूरा लाभ मिळो. यशाच्या शुभकामनेसहित खालील माहिती आम्ही देतो. कृपया धम्मसेवा देण्यास येण्यापूर्वी ती लक्षपूर्वक वाचावी.

निःस्वार्थ सेवा

धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी आणि मुक्तिच्या दिशेने टाकलेले पाऊल हे निःस्वार्थ सेवेचे आवश्यक व अनिवार्य अंग आहे. विपश्यनेच्या अभ्यासाने हळू ह्ळू मनोविकार दूर होतात आणि परिणामस्वरूप आंतरिक शांति व सुखाचा अनुभव येऊ लागतो. ही दुःखापासूनची मुक्ति आंशिक असली, तरीसुद्धा ह्यामुळे धर्माची अद्भुत शिकवण आणि हे शिकवणाऱ्याप्रति कृतज्ञता भाव उत्पन्न होतो. परिणाम स्वरुप अशी धर्म-कामना उत्पन्न होते की दुसऱ्यांना देखील ह्या मंगलमय धर्माच्या मार्गाने जाण्यासाठी कोणत्या प्रकारे साहाय्य करु. शिबीरामध्ये सेवा देताना साधक जेव्हा धर्म शिकण्यासाठी येतात तेव्हा कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता त्यांना मदत म्हणून कृतज्ञता दर्शविण्यासाठी ही एक संधी असते. दुसऱ्याना निःस्वार्थ सेवा देण्यामुळे आपण आपली सेवासुध्दा करतो, आपल्या दहा *पारमितां*चा(पुण्य) विकास करतो आणि आपला अहंभाव विरघळतो.

धर्मसेवा कोण करू शकतो.

ज्या साधकाने पूज्य गुरुजी किंवा त्यांच्या सहाय्यक आचार्याबरोबर सफलतापूर्वक दहा दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे ( हा नियम अपवादात्मक परिस्थितीत शिथील केला जाऊ शकतो ) आणि जे आधीच्या विपश्यना शिबीरानंतर दुसऱ्या कुठल्याही प्रकारची साधना करीत नाहीत ते धर्मसेवा देऊ शकतात.

अनुशासन संहिता

जर येथे काही सांगितले नसल्यास, धर्मसेवकाला साधना शिबीरांसाठीच्या अनुशासन संहिते मधील नियमांचे यथासंभव पालन केले पाहिजे. हे नियम सेवकांनादेखील लागू आहेत. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यक असल्यास किंचित सूट दिली जाऊ शकते.

पंचशील

पंचशीलाचे पालन करणे हा अनुशासन संहितेचा पाया आहेः प्राणीहत्या-हिंसा यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, व्यभिचारापासून दूर राहणे; अर्थात, साधना केंद्रात कोणत्याही लैंगिक आचार विचारापासून दूर राहणे, मिथ्या भाषणापासून दूर राहणे (खोटे, चुगली, निंदा, कडवट बोलण्यापसून दूर राहणे) सर्व प्रकारच्या नशेपासून दूर राहणे

या पाच शीलांचे पालन विपश्यना केन्द्रामध्ये किंवा तात्पुरत्या शिबीर स्थानी रहाणाऱ्या व्यक्तिसाठी अनिवार्य आहे आणि याचे कडकरित्या पालन केले पाहिजे. धम्मसेवकांकडून अपेक्षा आहे कि सामान्य जीवनांत सुध्दा पंचशीलांचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असावे.

निर्देशांचा स्विकार

धम्म सेवकाने आचार्य, साहाय्यक आचार्य तसेच मध्यवर्ती प्रशासन आणि व्यवस्थापन सदस्यांच्या सूचनांचे पालन करावे. जे साधना किंवा सेवेमध्ये ज्येष्ठ आहेत अशांकडून सल्ला व मार्गदर्शनाचा स्वीकार करावा. जबाबदार व्यक्तींच्या निर्देशाविपरीत अथवा त्यांच्या अनुमति शिवाय कामकाजाच्या पध्दतिमध्ये बदल तसेच नव्या कामाची सुरुवात केल्याने भ्रांती पसरेल, शांती नष्ट होईल, अनावश्यक तणाव निर्माण होईल आणि वेळ, शक्ती तसेच संसाधनेचा दुरूपयोग होईल. असे मनमानीपणे केलेले काम सहकार तसेच सौहार्दता असलेल्या धार्मिक वातावरणाविरुध्द आहे. दिलेल्या सूचना पाळून धर्मसेवकाने आपल्या व्यक्तिगत मतांना बाजूला ठेवून साधकाच्या भल्यासाठी आणि शिबीरे व केंद्र प्रभावी तसेच शांतपणे चालण्यासाठी शिस्तबध्द सैनिकाप्रमाणे समर्पित भावनेने निर्देश दिल्याप्रमाणे काम करायला पाहिजे. खुल्या वातावरणात तसेच विनम्रतेने चर्चा करुन समस्या सोडविल्या पाहिजेत. चांगल्या सूचनांचे जेष्ठ लोकांकडून स्वागतच केले जाते.

साधकांबरोबरील संबंध

शिबीर आणि साधनाकेंद्र साधकांना साधना शिकण्यासाठी तसेच त्यामध्ये पुष्ट होण्यासाठी वेळ मिळण्यासाठी असते. शिबीरे आणि साधना केंद्र साधकासाठीच आहेत; म्हणून साधक महत्वपूर्ण व्यक्ती आहे जी सर्वात महत्वपूर्ण काम करत असते. त्यांची सहाय्यता शक्य त्या सर्व मार्गाने करावी हेच धर्मसेवकाचे काम आहे. म्हणूनच साधकांचा निवास, स्नानगृह, भोजन इत्यादि सुविधानांना धम्मसेवकाने प्राधान्य दिले पाहिजे. अत्यंत अनिवार्य नसल्यास सेवकाने साधकांच्या भोजनानंतरच भोजन करावे आणि त्यांनी साधकांबरोबर भोजनालयामधे बसू नये. त्यानी साधक नसतील त्या वेळेसच स्नानगॄह वगैरेचा उपयोग करावा. साधकांच्या पश्चातच झोपावे कारण काही समस्या असल्यास त्याना ते मदत करु शकतील. अन्य सुविधांच्या उपयोगासाठीदेखील साधकाला प्राथमिकता द्यावी आणि शक्यतोवर त्यांचा शांतीभंग धर्मसेवकाने टाळावा.

साधकांप्रती व्यवहार

केवळ पुरुष धम्मसेवकांनी पुरुष साधकांबरोबर व स्री धर्मसेविकांनी स्री साधकांबरोबर संपर्क करावा. साधक अनुशासन संहिता आणि नियमावलीचे पालन योग्य रितीने करीत आहेत अथवा नाहीत यावर त्यांनी लक्ष ठेवावे. आवश्यक असल्यास त्यांच्याशी बोलावे. सौहार्दपूर्ण आणि विनम्र असावे. सकारात्मक शब्दांव्दारे साधकांना त्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रोत्साहित करावे. जर तसे करता आले नाही, तर अन्य कोणा धम्मसेवकाला संपर्क करण्यास सांगितले पाहिजे. व्यवस्थापकांनी काळजी घ्यावी, की कोठे अनुशासनहीन कृत्य दिसले, तर त्याच्या कारणाची खोलवर चौकशी करावी, त्याचे वरवर तोंडदेखले मूल्यमापन करू नये.

सर्व धम्मसेवक आदरयुक्त आणि विनम्र असावेत, तसेच ते मदतीसाठी तत्पर असावेत. साधकाचे नाव माहीत करून घेतल्यास अधिक योग्य. कमीत कमी बोलावे. वाद बिल्कुल घालू नये. धम्मसेवकांनी साधकाला त्याच्या समस्येनुसार योग्य व्यक्तीकडे, सहाय्यक आचार्य किंवा शिबीर व्यवस्थापक यांच्याकडे जाण्यासाठी प्रेरित करावे. साधकाच्या साधनेबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न धम्मसेवकांनी करू नये, त्यासाठी साहाय्यक आचार्यांकडे जाण्याची सूचना त्याला करावी. व्यवस्थापनाचा साधकांशी असलेल्या एखाद्या संपर्काबाबत साहाय्यक आचार्यांना कल्पना द्यावी. स्वयंपाकगृह अथवा अन्य ठिकाणी साधकांच्या वैयक्तिक बाबींवर कारणाशिवाय चर्चा टाळावी.

धम्मसेवकांची साधना

धम्मसेवकांनी न्यायनिष्ठ बुद्धीने, क्षणाचाही अपव्यय न करता व पूर्ण एकाग्रतेने सेवा करावी, हे जणू त्यांचे प्रशिक्षणच आहे. त्याबरोबरच त्यांनी ध्यान साधनेचा अभ्यासही चालू ठेवावा. प्रत्येक धम्मसेवकांनी शक्यतोवर सकाळी ८ वाजता, दुपारी २.३० वाजता व संध्याकाळी ६ वाजता असणाऱ्या हॉलमधील सामूहिक साधना, अशी कमीत कमी तीन तास तरी ध्यान साधना प्रतिदिन केली पाहिजे. त्याव्यतिरिक्त प्रत्येक दिवशी रात्री ९ वाजता धम्महॉलमध्ये धम्मसेवकांकरिता साहाय्यक आचार्यांसोबत एक छोटी ध्यानसाधना आयोजित केलेली असते. ह्या ध्यानसाधना धम्मसेवकांच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात. धम्मसेवकांनी सेवा देत असताना विपश्यना व आवश्यक असेल तेव्हा आनापान केले पाहिजे. सामूहिक साधनेवेळी धम्मसेवक आपले आसन बदलू शकतात.

क्षणोक्षणी स्वतःचे निरीक्षण करणे, ही धर्मसेवकांची जबाबदारी आहे. धर्मसेवकांनी प्रत्येक परिस्थितीत समता ठेवावी तसेच चित्ताच्या चेतनेचे परिक्षण करावे. थकल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ते शक्य होत नसेल तर कामाची कितीही निकड असली तरी त्यांनी अधिक ध्यानसाधना करावी किंवा विश्रांती घ्यावी. ‘माझ्याशिवाय काम होणार नाही’ अशी भावना बाळगू नये. जर स्वतःच्या अंतरात समता आणि शांतता असेल, तरच योग्य धर्मसेवा घडू शकते. दीर्घ काळ केंद्रामध्ये राहणाऱ्या धर्मसेवकांनी आपले कार्य बाजूला ठेवून वेळोवेळी १० दिवसीय शिबीर करावे आणि त्यावेळी आपण धर्मसेवक आहोत म्हणून विशेष सुविधेची अपेक्षा करू नये.

साहाय्यक आचार्यांबरोबर विचार विनिमय

धर्मसेवकाने आचार्य किंवा साहाय्यक आचार्यांबरोबर आपल्या समस्या किंवा प्रश्नाविषयी विचार-विनिमय करत रहावे. धर्मसेवकासाठी वार्तालापाची उचित वेळ रात्री ९.०० नंतरच्या मैत्री सत्रानंतर आहे. व्यक्तिगत मुलाखतीसाठी देखील वेळ दिली जाऊ शकते. साहाय्यक आचार्यांच्या अनुपस्थितित धर्मसेवकाने आपले प्रश्न किंवा समस्या मध्यवर्ती व्यवस्थापनाच्या नजरेस आणाव्यात.

पुरुष-महिला पृथकत्व तसेच विभक्ती

हा पृथकत्वाचा किंवा विभक्तीचा नियम शिबीराच्या वेळेस तसेच केन्द्रावर होणाऱ्या दोन शिबीरादरम्यान देखील नेहमीच लागू आहे. संपूर्ण विभक्तीकरण धर्मसेवकांना कामाच्या संबंधामुळे व्यवहार्य नसल्यास, अशा विशिष्ट परिस्थितीत संपर्क करावा लागलाच, तरी तो कमीत कमी शब्दांमध्ये असावा. ही सवलत म्हणजे मौजमजेची संधी आहे असे पुरुष आणि महिला सेवकानी समजू नये. पति-पत्नी सेवा देत असल्यास त्यानी देखील ह्या नियमाचे कसोशीने पालन करावे.

शारीरिक संपर्क

ध्यानानुकूल पवित्र वातावरण राखण्यासाठी तसेच साधकांसमोर आदर्श उदाहरण ठेवण्यासाठी सर्व पुरुष व महिला सेवकांनी आपआपसांत तसेच साधकाशी शारीरिक संपर्क ठेवू नये. ह्या नियमाचे ध्यानकेन्द्रावर सदैव दॄढतापूर्वक पालन करावे.

सम्यक वाणी

धम्मसेवकानी साधकाप्रमाणे यथासंभव आर्यमौनाचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी ध्यान परिसरात मौन ठेवावे तसेच केवळ आवश्यकतेपुरतेच बोलावे. जरी कोणी साधक ऐकू येण्याच्या टप्प्यात नसला किंवा शिबीर चालु नसले तरीसूध्दा अकारण शांतता भंग करु नये.

बोलताना धर्मसेवकाने सम्यक वाणीचाच उपयोग करावा. खोटे बोलू नये किंवा सत्याहून कमी-जास्त बोलू नये. कठोर किंवा कडवट बोलू नये. धर्माच्या मार्गाने चालणारा सौम्य तसेच मॄदु भाषीच असतो. निंदा किंवा चुगली करू नये. आपल्या नकारात्मक भावनेमुळे दुसऱ्या कुणावर टीका करू नये. काही समस्या असल्यास सबंधित व्यक्तिच्या नजरेस आणावी किंवा साहाय्यक आचार्यांच्या नजरेस आणावी. निरर्थक गप्पा, निरर्थक चर्चा करू नयेत. गाणे गुणगुणणे, शिट्टी वाजवणे इ. करु नये किंवा जोराचा आवाज करू नये.

निर्विवादपणे, शांततेपेक्षा सम्यक वाणी नक्कीच अवघड आहे. म्हणुनच धर्माच्या मार्गाने चालणाऱ्यासाठी हे अत्यंत महत्वाचे प्रशिक्षण आहे.

व्यक्तिगत पेहराव

लोकांच्या दृष्टितून धम्मसेवक हा साधनाविधि तसेच केन्द्राचे प्रतिनिधित्व करतो. ह्या कारणामुळे धर्मसेवकाचे दिसणे नेहमीच नीटनेटके आणि स्वच्छ हवे तंग,पारदर्शी, दिखाऊ पेहराव ज्यामुळे अनुचित लक्ष वेधले जाईल असे कपडे घालू नयेत (जसे की आखूड पँट, आखूड स्कर्ट, तंग लेगींग, बिनबाह्याचे किंवा अत्यल्प ब्लाऊज). अलंकार कमीतकमी असावेत किंवा वापरु नयेत. हे नम्रतेचे धोरण सर्वकाळ रहावे.

धूम्रपान

धम्माचा स्विकार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षा केली जाते की ती व्यक्ती मद्य, गांजा, चरस इत्यादि नशा आणणाऱ्या वस्तूचे सेवन करणार नाही. तंबाखुचे कोणत्याही प्रकारातील सेवन केंद्राच्या हद्दीत किंवा बाहेर निषिध्द आहे. धर्मसेवकाने धूम्रपान करण्यासाठी देखील केंद्राच्या बाहेर जाऊ नये.

भोजन

केन्द्रावर आरोग्यदायी, शुध्द शाकाहारी भोजन दिले जाते, कोणा विशिष्ट भोजनतत्वज्ञानाचे अनुसरण होत नाही. इतर साधकांप्रमाणेच धर्मसेवकांनी सुध्दा जे काही दिले जाते त्याचे निष्कामभावाने ग्रहण करावे.

शिबीरामध्ये शिजविले आणि दिले जाणारे अन्न पूर्णतः शाकाहारी असल्याने ज्या पदार्थांत मद्यार्क, कडक दारु, अंडे, मांस इत्यादि असले तर, (काही बेक केलेले, मेयोनेज इत्यादी), किंवा प्राणी आम्लयुक्त असलेले चीझ इत्यादी पदार्थ केन्द्रावर आणू नयेत. थोडक्यात म्हणजे बाहेरील खाद्य पदार्थ शक्यतोवर केन्द्रावर आणू नयेत.

धम्मसेवक पंचशीलांचे पालन करतात. म्हणूनच आवश्यकता वाटल्यास संध्याकाळचे भोजन करू शकतात. उपवास करण्यास मनाई आहे.

वाचन

धम्मसेवक स्वतःला अद्यावत ठेवण्यासाठी वर्तमानपत्र किंवा पत्रिका आपल्या निवासस्थानी आणि साधकांच्या नजरेबाहेर वाचू शकतात. ज्यांना रोजच्या बातम्याखेरीज आणखी वाचण्याची इच्छा असल्यास ते केन्द्रावरील धम्मवाचनालयातील निवडक उपलब्ध पुस्तकांतून एखादे पुस्तक वाचू शकतात. कादंबरी किंवा मनोरंजनात्मक पुस्तके वाचण्यास मनाई आहे.

बाह्य संपर्क

साधकाप्रमाणे धर्मसेवकानी बाह्य जगापासून अलिप्त रहावे अशी अपेक्षा नाही. शिबीरांत सेवा देत असताना अनिवार्य कामासाठीच सहाय्यक आचार्यांच्या परवानगीने स्थान सोडावे. टेलीफोन कॉल सुध्दा कमीत कमी असावेत. धर्मसेवकाचे व्यक्तीगत अतिथि व्यवस्थापकाच्या पूर्व परवानगीने भेटण्यासाठी येऊ शकतात.

केन्द्राची स्वच्छता

केन्द्र निटनेटके आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करणे हे धम्मसेवकाचे कर्तव्य आहे. स्वयंपाकघरासहित भोजनालय, ध्यानकक्ष, निवासस्थान, शौचालय, स्नानगृह, कार्यालये आणि परिसर स्वच्छ ठेवावा. आवश्यकता असल्यास सेवकांनी नियमित कार्याशिवाय अन्य काम करण्यासाठी देखील तत्पर रहावे.

केन्द्रातील धम्म संपत्तिचा उपयोग

प्रत्येक साधक चोरी करण्यापासून दूर राहण्याच्या शीलाचे व्रत घेतो. धम्मसेवकानी सुध्दा केन्द्रातील संपत्तीचा आपल्या व्यक्तिगत उपयोगासाठी वापर करु नये. प्रबंधकाच्या पूर्वानुमतिशिवाय कोणत्याही प्रकारचे सामान आपल्या निवासस्थानी किंवा स्वतःच्या उपयोगासाठी आणू नये.

केंद्रावर दीर्घकालीन सेवा

गंभीर साधकांना धम्माचा अभ्यास आणि सैध्दांतिक पक्ष पुष्ट करायचा असेल, तर ते केन्द्रावरील आचार्यांच्या बरोबर विचारविनिमय करुन त्यांच्या परवानगीने दीर्घकालीन सेवा देऊ शकतात. ह्या कालावधीत आचार्य तसेच व्यवस्थापनाबरोबर सल्लामसलत करुन धम्मसेवक काही शिबीरास बसू शकतात आणि दुसऱ्या शिबीरात सेवा देऊ शकतात.

दान

साधकांच्या अनुशासन संहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे कि शिबीर तसेच केन्द्रावर प्रशिक्षण, भोजन, निवास आणि अन्य सुविधा साधकांसाठी पुर्णतया निःशुल्क आहेत. हे धम्मसेवकांना देखील लागू आहे.

शुध्द धम्माचे प्रशिक्षण नेहमीच निःशुल्क दिले जाते. भोजन, निवास व अन्य सुविधा जुन्या कृतज्ञ साधकाव्दारे उदार मनाने दिल्या जाणाऱ्या दानामुळे सुलभ होऊन जातात. धर्मसेवकांनी ह्याचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे आणि त्यांच्या दानाचा अपव्यय टाळून उत्तम सेवा दिली पाहिजे की जेणेकरुन दानाव्दारे दिल्या गेलेल्या दानाचा अधिकाधिक लाभ प्राप्त होईल. ह्या प्रकारेच धर्मसेवकसुध्दा दुसऱ्यांच्या हितार्थ दान देऊन आपली दान पारमी विकसित करु शकतात. वस्तुतः शिबीरे तसेच केन्द्र कृतार्थ साधकांनी दिलेल्या दानावरच चालू असतात.

कोणीही धम्मसेवक/धम्मसेविकांनी स्वतःसाठी कोणत्याही प्रकारे धनराशी किंवा अन्य वस्तू देऊ नयेत. प्रत्येक दान दुसऱ्यांच्या हितासाठीच असायला हवे. धम्मसेवा कदापिहि भोजन, निवास इत्यादिच्या मोबदल्यासाठी नसावे. उलट धम्मसेवा ही सेवकांच्या फायद़्याचीच आहे, कारण की त्यामुळेच धम्माचे अमूल्य प्रशिक्षण मिळते. शिबीर किंवा केन्द्र हे साधनेची आणि धम्माच्या आचरणाचा अभ्यास करण्याची संधी देते आणि शिवाय धम्म आचरणात कसा आणावा हे दुसऱ्यांशी नम्रता व करुणेने व्यवहार करताना शिकविते.

सारांश

धर्मसेवकांनी आचार्य तसेच व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन करुनच सेवा करायला हवी. त्यांनी कोणत्याही प्रकारची बाधा न आणता साधकांना सर्व प्रकारची मदत करायला पाहिजे. धर्मसेवकाने आपले वर्तन असे ठेवावे की, ज्याना धर्माबद्दल संदेह किंवा शंका आहे त्यांना प्रेरणा मिळेल आणि जे धम्माने प्रेरीत आहेत त्यांच्यात अधिक श्रध्दा उत्पन्न होइल. सेवकांनी नेहमीच लक्षांत ठेवले पाहिजे की त्यांच्या सेवेचा हेतू दुसऱ्यांना मदत करता करता स्वतःला धर्मामध्ये स्थापित करण्याचा असतो.

हे नियम आपल्यास त्रासदायक वाटल्यास कृपया आपण आचार्य किंवा प्रबंधकाकडून त्वरीत स्पष्टीकरण मागावे.

आपली सेवा आपणास धम्म-पथावर, निर्वाणिक अवस्थेकडे, दुःखापासून मुक्तीकडे तसेच खऱ्या सुखाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत करो.

सर्वांचे मंगल होवो.